औरंगाबाद : मला कोणतेही पद नको मोकळे राहू द्या, अनेक हिशेब चुकते करायचे आहेत, असा सूचक इशारा काल गांधी भवनात आमदार सुभाष झांबड यांनी दिला. यापूर्वी लोकसभेत पराभूत झाल्यानंतर मतदान केंद्रावरच खैरेंनी माझे व्हायचे ते झाले, आता तुमचे बघा ! असा संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आता या दोन्ही पक्षात मोठे महाभारत घडणार यात शंका नाही.
लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सेनेतील नाराजीनाट्य, भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांची अलिप्तता, गलित गात्र काँग्रेस आणि आक्रमक एमआयएम ! यामुळे सर्वच पक्षांना आत्मपरिक्षण करायला लावणारी ही निवडणूक होती असे म्हणायला हरकत नसावी. मात्र यातून कोणत्याही प्रमुख पक्षाने बोध घेतला नाही. सेनेतील नाराजी संपलेली नाही भाजप-सेनेचे मनोमीलन झालेले नाही, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची तोंडे अजूनही विरुद्ध दिशेला आहेत. वंचित आघाडी कधीही दुफळी माजण्याची शक्यता व्यक्त होते आहे. एकंदरीत पक्षनिष्ठलाच तिलांजली दिल्याने कोणत्याही पक्षात एकवाक्यता नाही. त्यामुळे जसे जमेल तो आपले घोडे दामटण्याचा प्रयत्न करू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत झांबड यांच्या वरच मोठी जबाबदारी काँग्रेस पक्ष टाकेल असे एकंदर चित्र आहे. ते उमेदवारही असू शकतात. दुसरीकडे खैरे गटातील नेत्यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपशी दोन हात करणे सेनेला परवडणारे नाही, म्हणून सेना नेते सावध भूमिका घेत आहेत. ही निवडणूक पार पडली खरी रंगत येईल असे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे नेते आपले राजकीय हिशेब पूर्ण करणार आहेत. काँग्रेसच्या अनिल पटेल गट आणि अब्दुल सत्तार गट आमने-सामने येणार यात शंका नाही. विधानसभेला झांबडही मोकळे असणार आहेत. त्यावेळी लोकसभेतील पराभवाचा हिशेब ते पूर्ण करतील असे दिसते. एकंदरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुक अतिशय रंगतदार होणार यात शंका नाही.
खैरे गटात चुरस
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप-सेनेचे बहुमत असल्याने विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे अनेकांनी दावेदारी पेश केली आहे. राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी यांनी मुंबईत तळ ठोकला आहे तर सुहास दाशरथे, बंडू ओक यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजप कडूनही इच्छुकांनी फिल्डिंग लावल्याचे समजते. शेवटी मातोश्रीचा निर्णय अंतिम राहणार असल्याने एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असे समजते.